Tuesday, September 18, 2012

नव आव्हाना घेतो

नव आव्हाना घेतो 

समुद्र किनारी वाळूच्या पुळणीवर भटकंती करत असताना पुळण व समुद्र ह्यांची हद्द वेगळी करणाऱ्या क्षेत्रात वाळूवर पळणारी एक वेल सापडली ; ' मर्यादवेल '. पुळण जणू समुद्राचे अंगण. ह्या अंगणाची सीमा बांधते मर्यादवेल. अमर्याद ताकद असलेला समुद्र पुळणीने स्वतःला जणू मर्यादून घेतो. उधाणाच्या वेळेस आपले मर्याद क्षेत्र अधोरेखित करणाऱ्या मर्यादवेलीला भेटायला येतो ; स्वतःची ताकद सीमा क्षेत्रात ठेवायची आहे ह्याची स्वतःला आठवण करून देतो . पावसाळ्यात क्वचित सीमा ओलांडून स्वतःची ताकद आजमावून देखील बघतो.
समुद्र , नदी , पहाड आपापल्या क्षेत्राच्या मर्यादसीमा दाखवणाऱ्या खुणा जागोजागी उमटवत असतात. कधी वनस्पतीच्या रुपात,कधी प्राणीरुपात,कधी विशेष रंगाच्या मातीत तर कधी मूर्त अमूर्त दगड शिल्पात. माणसाचे काम आशा मर्यादवेल शोधणे. हे मर्याद क्षेत्र जाणून स्वतःचे क्षेत्र निश्चीत करणे. पण माणूस निसर्गाचे मर्याद संकेत विसरतो , त्यांच्याकडे कधी अजाणता , कधी जाणीवपूर्वक, कधी उद्दामपणे डोळेझाक करतो. नदीच्या पूर मैदानात घरे बांधतो , खाड्यांमध्ये भराव घालून टोलेजंग आकाशस्पर्शी इमले उभारतो, बीच रेसोर्ट उभारतो. आपण मर्यादाना ओलांडून अमर्याद झाल्याच्या आनंदात मशगुल होतो, स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतो.
मग .. एखादी सुनामीची लाट ..... !!!!! एका फटकाऱ्यात मानवाला किनाऱ्यापासून दूर लोटते, एखादी कोसी बंधनातून मुक्त होते, काही तासांचा पाऊस मुंबईला स्वतःच्या लपेटीत घेतो. खरच मानवी इच्छा , हव्यासाची ' मर्यादवेल ' कुठे आहे ? ...आहे का ?
गावातील इमला, मळ्यातील घर , तालुक्याच्या गावी घर ....... शहरातील फ्ल्याट , वीकएंड होमे , हॉलीडे होम .........निसर्गाला पुसत आपण निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय. निसर्गाचा शेजार करायच्या एवजी त्याच्या अंगणाला आपले अंगण मानू लागलो. आपण त्याच्या अंगणाचा भाग आहोत , तो आपल्या अंगणाच्या कुंपणा पलीकडे अमर्याद आहे.
मर्यादा का कुंपण , मर्याद रेषा का लक्ष्मण रेषा ! मानवी इच्छा , मानवी वर्तन , मानवाच्या आकांक्षा ...... माणूस माणसाला; माणसाच्या वर्तनाला; स्वातंत्राला कुंपण तरी घालतो किंवा लक्ष्मण रेषेत बद्ध करून टाकतो. धर्म ; संस्कृती रक्षणाच्या नावाखाली काय ल्यावे , काय करावे काय करू नये ह्यांच्या बंदी उभारतो किंवा तथाकथित धर्म ; संस्कृतीचे बंधन झुगारून देण्याचा नावाखाली वागण्याचे विधिनिषेध विसरतो.
विकास म्हणजे इच्छा आणि हाव ह्यातील मर्यादा आखता येणे , बंध मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातील मर्यादा बांधता येणे , लोकशासन म्हणजे अधिकार आणि जबाबदारीची सीमा कळणे. तुम्ही कोणती मर्यादवेल धारण करता तो तुमचा धर्म.
मानवी आकांषेचे क्षितीज अमर्याद आहे , असायलाच हवे .
"मर्यादांनी मर्यादून ? छे !! त्यांना उल्लंघुनी
पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी "
( जपानी नागरिकांच्या आव्हान घेण्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीस )

 

No comments:

Post a Comment